Ad will apear here
Next
कलेचा वारसा जपणारा काळा घोडा महोत्सव
सातव्या एडवर्ड राजाचा मूळ पुतळा, जो आता राणीच्या बागेत आहे.

दक्षिण मुंबईतील कलेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या काळा घोडा महोत्सवाचे यंदाचे विसावे वर्ष आहे. कला, संगीत व स्थापत्य कलेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हा महोत्सव करतो आहे. यंदाचा महोत्सव दोन फेब्रुवारीला सुरू झाला असून, १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘काळा घोडा’ या नावामागचे रहस्य, पुरातन वास्तू, कला आदींच्या जतनाचे महत्त्व आणि त्या बाबतीत या महोत्सवाचे कार्य या बाबींवर प्रकाश टाकणारा, ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांचा हा लेख...
.............
साधारणतः पंधराव्या शतकात, फ्रेंच व डच आक्रमणाचे भय ओळखून पोर्तुगीजांनी बॉम्बे कॅसलभोवती तटबंदी बांधली होती. तेव्हापासून, या छोटेखानी वसाहतीला बॉम्बे फोर्ट असे म्हणत. मुंबई इतिहासातील इसवी सन १८५६ ते १९४७पर्यंतचा काळ ब्रिटिश राजवटीचा मानला जातो. इ. स. १८६५मध्ये तटबंदी पाडण्यात आली. लायन गेटसमोरील रस्ता म्हणजे वर्तमान के. दुभाष रोड (तत्कालीन रॅम्पार्ट रोड) तटबंदीचा हिस्सा होता. रॅम्पार्ट म्हणजे तटबंदी. के. दुभाष रोड व महात्मा गांधी रोडला (तत्कालीन एस्प्लनेड रोड) जोडणाऱ्या मोकळ्या जागेला सुभाषचंद्र बोस चौक असे नाव आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात किंग एडवर्डचा (सातवा) काळसर रंगातील अश्वारूढ पुतळा याच जागेत होता. १९९८पासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात के. दुभाष रस्त्यावर ‘काळा घोडा कला महोत्सव’ साजरा करण्यास सुरुवात झाली. कला महोत्सवाला भेट देणाऱ्या स्थानिक, तसेच देश-विदेशातील असंख्य कलाप्रेमींना ‘काळा घोडा’ या अस्वाभाविक नावाविषयी कुतूहल असते! ‘काळा घोडा’ या नावामागचा इतिहास आणि कला व विविध शैलीतील स्थापत्यकला-सौंदर्य घटकांविषयी थोडे जाणून घेऊ या.

फोर्ट भागातील अवशेष

तत्कालीन मुंबईला आधुनिक शहराचा चेहरा देण्याचे श्रेय नागरी व्यवस्थापनाची उत्तम जाण व निर्णयक्षमता असलेले ब्रिटिश गव्हर्नर आणि तज्ज्ञ नगररचनाकारांना जाते. बांधकामाचा पूर्वानुभव आणि विदेशी भाषेचा गंधही नसलेल्या तत्कालीन आंध्र प्रदेशातील तेलुगू समाजातील कुशल कंत्राटदारांनी विदेशी शैलीतील इमारती प्रत्यक्षात उभ्या केल्या आहेत. भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम देखरेख, तसेच ब्रिटिश आर्किटेक्ट व कंत्राटदारांसाठी दुभाष्याचे काम केले होते. कालांतराने वसाहतकालीन वास्तुशैलीही ब्रिटिश राजवटीप्रमाणे लोप पावली. त्याचप्रमाणे तेलुगू समाजातील नव्या पिढ्यांनी पिढीजात बांधकाम व्यवसाय बंद करून इतर छोट्या-मोठ्या धंद्यांत शिरकाव केला. अनेक धर्म, जाती-जमातींतून बनलेल्या एकोप्याचे प्रतिबिंब सामाजिक विविधतेत दिसून येते, तर विविध देश-विदेशी स्थापत्यशैलीत बांधलेल्या इमारतींत अप्रतिम कला-सौंदर्याचा मिलाफ दिसून येतो! काळा घोडा परिसर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे!

जहांगीर आर्ट गॅलरी

काळा घोडा म्युझियम आर्ट परिघात दक्षिणोत्तर रिगल सिनेमा ते एस्प्लनेड मॅन्शन आणि पूर्व-पश्चिमेकडील लायन गेट ते ओव्हल मैदानापर्यंतचा भाग येतो. ब्रिटिश वास्तुविशारदांनी वेगवेगळ्या शैलीत इमारती बांधल्या. यात मुंबई विद्यापीठ, एलफिन्स्टन कॉलेज, डेव्हिड ससून लायब्ररी व्हिक्टोरियन निओ गॅाथिक शैलीत, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय इंडो सारासेनिक शैलीत, आर्मी नेव्ही इमारत रिनायसन्स रिव्हायवल शैलीत, तर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ही इमारत एडवर्डियन निओ क्लासिकल शैलीत बांधली आहे. मॉडर्न शैलीत बांधलेले मॅक्सम्युलर भवन व भारतीय कलेचे माहेरघर समजली जाणारी जहांगीर आर्ट गॅलरी वसाहतकालीन वातावरणात सहजपणे विलीन झाल्या आहेत. 

काळा घोडा - मूळ पुतळ्याचा १८७९मधील फोटो आणि त्या जागेचा अलीकडील फोटो.

तत्कालीन नागरी आराखड्यात विविध शैलीतील इमारती, तसेच शहर सुशोभीकरणासही तेवढेच महत्त्व दिले जात होते. सामाजिक बांधिलकीतून तत्कालीन धनिक सार्वजनिक जागेत कारंजे, क्लॉक टॉवर, फाउंटन उभारण्यात पुढाकार घेत असत. किंग एडवर्ड (सातवा) हा भारतास भेट देणारा पहिला राजा होता. राजाच्या भारतभेटीचे औचित्य साधून लोकहितवादी अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून या बगदादी ज्यू व्यापाऱ्याने राजाच्या सन्मानार्थ अश्वारूढ पुतळा बनवून शहर प्रशासनास भेट देण्याचे ठरवले. हा पुतळा लंडन येथील प्रसिद्ध शिल्पकार जोसेफ एडगर बोईम याने ब्राँझ धातूपासून बनवला होता. तो पुतळा दगडी शिल्पासमान दिसावा म्हणून त्याला दगडी रंगासारखी काळसर झळाळी दिली होती. पुतळ्यासाठी फ्लोरा-फाउंटन व वेलिंग्टन कारंजे या स्मारकाच्या मध्यावरील जागा निवडली होती. 

मूळ पुतळा

पुतळ्याचा चबुतरा

इसवी सन १८७९मध्ये भव्य दगडी चबुतऱ्यावरील १३ फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यानी केले होते. चौथऱ्याच्या पटलावर सर बार्टल फ्रियर, अल्बर्ट ससून, फिलीप वूडहाउस, डोसाभाई फ्रामजी, लॉर्ड नॉर्थ ब्रुक, तसेच बडोदा, कच्छ, म्हैसूर व कोल्हापूरचे संस्थानिक इत्यादींच्या प्रतिमा आढळतात. रुबाबदार पुतळ्यामुळे परिसरातील इमारती व वातावरणात भारदस्तपणा आला होता. हे दृश्य जनमानसाला आकर्षित करणारे होते. मुंबईतील एतद्देशीय श्रमजीवी वर्गाला विदेशी राजाचे नाव उच्चारण्यास कठीण जात असे. अशा प्रसंगी त्यांनी ‘रंग ओळख’ हा सोपा पर्याय निवडला! कोणत्याही सामाजिक परिवर्तनाची सुरवात सामान्यापासूनच होत असते. जनमानसात ‘काळा घोडा’ अशी एतद्देशीय स्थानओळख रूढ झाली. मूळ घोड्यासह मालकालाही जागेवरून हटवले, तरीही पुतळ्याचा रंग व घोड्याची प्रतिमाच जनमानसाच्या मनात टिकून राहिली!

१८७०मधील मार्बलचा पुतळा

तत्कालीन दक्षिण मुंबईत राज्यकर्ते व कर्तबगार गव्हर्नरांचे मार्बलमधील अनेक पुतळे होते. हे पुतळे वसाहतकालीन राजवटीची देण होती. वसाहतकालीन राज्यकर्त्यांचे पुतळे मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत नसावेत, या विचारधारेतून इ. स. १९६०च्या दरम्यान अनेक पुतळे भायखळ्यातील वीर माता जिजाई उद्यानात (क्वीन व्हिक्टोरिया गार्डन) हलवण्यात आले. पुतळ्यांची रवानगी ‘राणीच्या बागेत’च केली जावी, हा योगायोग की दुसरे काय, हे सांगणे कठीण आहे! इसवी सन १९६५मध्ये किंग एडवर्डचा (सातवा) पुतळाही तकलादू कारण पुढे करून राणीच्या बागेत हलवण्यात आला. इसवी सन १९२६मध्ये किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटल बांधण्यात आले. एकाच राज्यकर्त्याच्या स्मरणार्थ इमारत व शिल्प बांधले गेले होते. आजही ते हॉस्पिटल देशभरातील आर्थिकदृष्ट्या मागास जनतेसाठी अल्प खर्चात वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कार्य करते आहे! शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या शिल्पाबाबत सापत्नभाव दाखवला जाणे ही बाब कला-संवेदनशील मनास खटकणारी आहे!

काळा घोडा - मूळ पुतळ्याच्या जागी सुरू झालेला वाहनतळ

वसाहतकालीन परिसरातील जगप्रसिद्ध शैलीत बांधलेल्या इमारती हे मुंबईचे वैभव आहे. फोर्टमधील अनेक सुंदर दाखले केवळ दुर्लक्ष केल्यामुळे नजरेआड गेले आहेत. पुढील अनेक वर्षे टिकून राहण्याची क्षमता या इमारतींत आहे. परंतु इमारतींचे योग्य जतन झाले नाही, हे वास्तव आहे. उर्वरित सौंदर्यपूर्ण इमारतींचे योग्य मूल्यमापन व जतन व्हावे, या उद्देशाने काही समविचारी कला-संवेदनशील मंडळींनी एकत्र येऊन ३० ऑक्टोबर १९९८ रोजी काळा घोडा असोसिएशनची स्थापना केली. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आर्किटेक्ट अल्फाज मिलरच्या कल्पनेला श्रीहरी भोसले या शिल्पकाराने आकार दिला. सन २०१७मध्ये नव्या प्रतिमेतील घोडा प्रस्थापित करण्यात आला. घोडा पुनर्प्रस्थापनाचा हेतू साध्य झाला, प्रतिमेची उणीव भरून निघाली; पण अप्रतिम कलेचा नमुना असलेल्या मूळ शिल्पाला हटवून नेमके काय मिळवले, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो! मूळ पुतळ्याच्या जागेवर ‘पे अँड पार्क’चा बोर्ड ठेवला आहे. वाहनतळाचे आकारमान वाढवण्यासाठी केवढी मोठी किंमत मोजावी लागली! दिवसेंदिवस मुंबई शहर भरकटत चालले. मुंबईतील पुरातन इमारतींच्या जतनाची योग्य वेळ आम्ही केव्हाच गमावून बसलो आहोत. करोडो रुपयांच्या निधीतून पुनरुज्जीवित केलेले फ्लोरा-फाउंटन कारंजे दोनच दिवसांनंतर बंद पडले, हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे!

काळा घोडा कला महोत्सव

गोदावरी घंटाकाळा घोडा असोसिएशनतर्फे १९९९च्या फेब्रुवारीपासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात के. दुभाष रस्त्यावर ‘काळा घोडा कला महोत्सव’ साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रति वर्षी महोत्सवात पुस्तके, हस्तकला, स्वदेशी वस्त्रे, विविध धातूंच्या मूर्ती, तसेच नैसर्गिक साहित्यापासून बनवलेल्या वस्तूंची विक्री करणारे स्टॉल्स असतात. स्टँडअप कॉमेडी, थिएटर, नागरी स्थापत्यकला, दृश्यकला, इत्यादी कलांचे प्रदर्शन व विविध विषयांवर आधारित कार्यशाळांमधून कला-संवाद साधला जातो. हे महोत्सवी वातावरण काही काळ का होईना, भान विसरायला लावते! हा रस्ताच कला महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. वर्षभर एकाकीपणाला कंटाळलेला के. दुभाष रोड कलामहोत्सवी आठवड्यात मात्र निरनिराळ्या कलाकृती व रंगीबेरंगी वेश परिधान केलेल्या मित्रांच्या गर्दीत स्वतःला हरवून घेतो! महोत्सवातील कलाकृती सामाजिक संदेश सांगण्याचा प्रयत्न म्हणून मांडलेल्या असतात. अशा कलाकृती समजून घेण्यात स्वारस्य नसलेल्या बहुतांश मंडळींना कलाकृतीसोबत सेल्फी काढण्याचे व सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे वेड असते. अनेक कलावंतांना याचा त्रास सहन करावा लागतो! 

कलांतर

याआधीच्या महोत्सवात अनेक क्लिष्ट नागरी प्रश्न कलात्मक दृष्टिकोनातून मांडून संदेश देण्याचे काम केले होते. त्यात वृक्षांची कत्तल, ‘Tree 60 degees’, ‘ I need some air,’ ‘Currency to Country’, शिडीवरील कावळ्यांची शाळा, धाग्यांनी वेढलेले वटवृक्ष, सायकल चलाव, मुंबईचा डबेवाला, भ्रष्टाचार, प्रदूषण आदी प्रश्नांचा समावेश होता. कोरुगेटेड पेपर, लाकूड, लोखंड इत्यादी साहित्य वापरून कलाकृती बनवल्या जातात. ‘हँड पेंटिंग’मधील प्रतीकात्मक काळा घोडा हे सर्वांचे आकर्षण होते. 



बहुमुखी घोडा आणि नवा 'काळा घोडा'

कल्पतरूयंदा या कला महोत्सवाचे विसावे वर्ष आहे. यंदाच्या सादरीकरणात कालमंडळामधून (Wrapping time) ‘काळा घोडा’ची कारकीर्द दर्शवली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती वर्षाचे निमित्त साधून त्यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन या महोत्सवात मांडण्यात आले आहे. महोत्सवाच्या परिसरात प्रवेश करताना आकाशाकडे झेप घेणारा पंखरूपी बहुमुखी घोडा लक्ष वेधून घेतो. काली-पिली टॅक्सीचे अंतरंग पाहायला मिळतात. रंगीबेरंगी धाग्याने लपेटलेल्या वृक्षाला ‘कल्पतरू’ असे नाव दिले आहे. मेरिटाइम हिस्ट्री सोसायटीने सादर केलेली वेळदर्शक गोदावरी ‘घंटा’, ‘बॉम्बे टाइम्स’ने मांडलेला ‘Flirt with your city’, ‘माय मुंबई’ने मांडलेला ‘City authors stories write,’ ‘Chariot of horses’ अशा स्टॉल्सवरील सादरीकरणातून आधुनिक कलेतील बदल दिसून येतात. के. दुभाष रस्त्यावर मांडलेले सादरीकरण म्हणजे काळा घोडा महोत्सव असे अनेकांना वाटते. वर्कशॉप, फिल्म स्क्रीनिंग, चित्रशाळा, कला, वास्तुकला या विषयांवरील संवाद वगैरे गोष्टींसाठी परिसरातील इमारतींचा उपयोग केला जातो. संगीत, वाद्यसादरीकरण बागेत केले जाते. के. दुभाष रस्ता महोत्सवाचा केंद्रबिंदू असला, तरी आजूबाजूचे स्थापत्य खऱ्या अर्थाने थ्री-डी रूप घेते. थोडक्यात, कला, संगीत व स्थापत्य कलेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करणारा महोत्सव म्हणजे काळा घोडा महोत्सव!






चिमण्या वाचवण्याचा संदेशकोणतेही सौंदर्य ही साक्षात अनुभूती असते. सौंदर्याची कल्पना प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत असते. ती कालसापेक्ष असते. सौंदर्य जाणून घ्यावयाचे असेल, तर आपल्याकडे सौंदर्यदृष्टी हवी. स्थापत्य कला-सौंदर्याचे नानाविध नमुने काळा घोडा परिसरात पाहायला मिळतात. स्थापत्यकलेने नटलेल्या सौंदर्यपूर्ण परिसराची वैशिष्ट्ये अशी आहेत -

- विविध वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील प्रमाणबद्ध इमारती. 
- विशाल रुंदीचे रस्ते. जवळपास त्याच रुंदीच्या आकारमानातील उंच इमारती. 
- समान उंचीच्या इमारती. 
- भरभक्कमतेची खात्री देणारे दगडी बांधकाम व एकल रंगसंगती व त्यावरील नक्षीकाम. 
- भरपूर रुंद व आच्छादित पदपथ. 
- घनदाट छाया देणारे उंच, डेरेदार निवडक वृक्ष. 
- शहर सुशोभीकरणात फाउंटन, क्लॉक टॉवर, पुतळ्यांचा कलात्मक वापर. 

वरील वैशिष्ट्यांचा एकमेकांशी असलेला समतोल, लयबद्धता, मोठ्या आकारातील मौदाने, विविध शैलीत आकारबद्ध केलेली कारंजी व उत्कृष्ट पुतळ्यांची रेलचेल यांमुळे वातावरणातील प्रसन्नता वाढते. या संयुक्त दृश्य परिणामातून वास्तुविशारदांनी परिसरसौंदर्य खुलवण्याची किमया साधली आहे. नागरिकांना काळा घोडा परिसराला वारंवार भेट द्यावीशी वाटते. यातच सारे काही आले!

कॅफे समोवर

कलाप्रेमी

काळा घोडा परिसरात कलावंतांची वर्दळ असते. जहांगीर आर्ट गॅलरी, मॅक्सम्युलर भवन आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या कलाविषयक संस्था याच परिसरात आहेत. सन १९६४मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीतील ६०० स्क्वेअर फूट जागेत केवळ दोन टेबलांच्या रांगा असलले एकमेवाद्वितीय असे ‘कॅफे समोवर’ सुरू झाले. कॅफे समोवरचा चहा किंवा स्नॅक्स आणि तासन् तास गप्पा हे समीकरण ठरलेले असे! तसेच, ‘वेसाइड इन’मध्ये दिग्गज कलावंतांची ऊठ-बस असे. नवोदित कलावंतांना आपल्या कल्पनेतील दुनियेत रमविणाऱ्या विविध कला क्षेत्रांतील मिश्किल कलावंतांना मी जवळून पाहिले आहे! दर्दी मुंबईकरांची आवड जोपासणारे ऱ्हिदम हाउस व संगीत या वेगळ्या न करता येणाऱ्या गोष्टी होत्या. वर्तमान डिजिटल तंत्रज्ञानाने त्याचे अस्तित्वच पुसून टाकले आहे. गेली अनेक वर्षे कलावंतांच्या हृदयात स्थान बनून राहिलेल्या बैठकीच्या जागा आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत! ती उणीव भरून काढण्याची गरज आहे!

कलाप्रेमी

काळा घोडा परिसराचे हवाई दृश्य

युरोपमध्ये संपूर्ण शहर जतन केल्याचे अनेक दाखले आहेत. योगायोगाने याचा प्रत्यक्ष पुरावाच जहांगीर आर्ट गॅलरीत पाहायला मिळाला. व्हिज्युअल डिझाइन विषयात कौशल्य मिळवलेल्या संजीव भागवत या आर्किटेक्टने चौदाव्या शतकापासून भरभराट पाहिलेल्या झेक प्रजासत्ताकची राजधानी असलेल्या प्राग शहराचे पुरातन सौंदर्य छायाचित्रांच्या माध्यमातून मांडले आहे. कॅमेऱ्यात कैद केलेल्या चौकटीतील बारकावे चार शतकांपूर्वीचे आहेत, यावर विश्वास बसत नाही! शहरातील मुख्य रस्त्याची दगडी फरसबंदी (Cobblestone) शहर सौंदर्याचा भाग असू शकते, हे प्रागमध्येच शक्य आहे. वर्तमान मुंबईतील रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक हे त्याचे विरुद्ध टोक आहे. पुरातन वस्तू असोत की इमारती, विदेशात त्यांचे योग्य रीतीने जतन होते. आपण तसे केले नाही. छायाचित्रे पाहताना ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे तत्कालीन संपादक स्टेनली रोड यांनी लिहिलेल्या वाक्याची आठवण झाली. सन १८८०च्या दरम्यान फोर्ट तटबंदी व तीन मुख्य दरवाजे पाडून टाकण्यात आले. ही बातमी ऐकून निराश झालेल्या संपादकांनी लिहिले होते – ‘त्या प्रसंगाच्या आठवणीने मन व्यथित होते. ज्या पुरातन स्थापत्याशी जोडले गेलो होतो, ती श्रृंखलाच आम्ही तोडून टाकली आहे. अरे! निदान एक दरवाजा तरी आठवण म्हणून जतन करायला हवा होता!’ केवढी ही संवेदनशीलता...

एस्प्लनेड मॅन्शन - जुना आणि अलीकडील फोटो.

नॅशनल आर्ट गॅलरी

काळा घोडा परिसरातील वसाहतकालीन वस्तूंचे संग्रहालय एस्प्लनेड मॅन्शनपासून जवळच आहे. जवळपास एकाच कालावधीत बांधलेल्या इमारती आजही कार्यरत आहेत. अनेक घटनांचा साक्षीदार असलेला प्रतीकात्मक काळा घोडा प्रस्थापित झाला. एस्प्लनेड मॅन्शन ही इमारत एकेकाळी अनेक महत्त्वपूर्ण घटनांची साक्षीदार राहिली आहे. महोत्सवी झगमगाटात सिग्नलच्या अंधुक प्रकाशात दोलायमान अवस्थेतील एस्प्लनेड मॅन्शनचे चित्र मन विचलित करणारे आहे. तरीपण वसाहतकालीन पुरातन दाखलेच मुंबईची ‘सौंदर्य ओळख’ टिकवून आहेत! बदल ही काळाची गरज असते. वर्तमान कला सादरीकरणातील काळानुरूप बदलही आम्हाला मान्य आहे. परंतु वर्तमान पूर्ततेसाठी गरजेसमोर शरणागती पत्करून अनेक वर्षे जोपासलेली पुरातन शिल्पकला किंवा गौरवशाली स्थापत्यमोल पणाला लावणे योग्य नव्हे, असे मला वाटते! स्थापत्याचा एकमेव नमुना असलेल्या एस्प्लनेड मॅन्शनलाही एक दिवस काळा घोडा महोत्सवातील झगमगाटात सहभागी करून घेतले जाईल, हीच अपेक्षा.

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

(मुंबईतील काही पुरातन वास्तूंचे सौंदर्य उलगडून दाखवणारे चंद्रशेखर बुरांडे यांचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(यंदाच्या आणि आतापर्यंतच्या काळा घोडा कला महोत्सवाची काही क्षणचित्रे पाहा सोबतच्या व्हिडिओत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVUBX
 Local history can be important and valueable .
This article is a good example ,
Equally omportant feature of this article : it contains many
aspects of the ' company ' rule which made people prefer it
Similar Posts
मुंबईतील आर्ट डेको वास्तुशैलीचे सौंदर्य मुंबईतील ओव्हल मैदान आणि मरीन ड्राइव्ह या भागांत ब्रिटिश काळात आर्ट डेको शैलीत निवासी संकुले बांधण्यात आली. या इमारती बांधताना दीर्घ काळ टिकण्याचा हेतू तर होताच; पण त्यांची रचना करताना सौंदर्यदृष्टी वापरून त्या दीर्घ काळ स्मरणातही राहतील, या पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. या शैलीबद्दल विस्तृत माहिती
काळा घोडा फेस्टिव्हल : अनोख्या महोत्सवाची यंदाची वैशिष्ट्ये मुंबईतील प्रसिद्ध काळा घोडा महोत्सवाचा समारोप यंदा नऊ फेब्रुवारी २०२० रोजी होत आहे. या अनोख्या कला महोत्सवाच्या वैशिष्ट्यांची ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी छायाचित्रांसह करून दिलेली ही तोंडओळख...
वैभवशाली फ्लोरा फाउंटनचा स्थापत्य इतिहास आणि कलासौंदर्य ब्रिटिशकालीन मुंबईत उभारल्या गेलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण इमारतींपैकीच एक म्हणजे फ्लोरा फाउंटन. १८६९मध्ये सुरू झालेले हे कारंजे अलीकडे काही काळ बंद होते. यंदाच ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी या फ्लोरा फाउंटनचा स्थापत्य इतिहास आणि कलासौंदर्य या दृष्टीने घेतलेला हा आढावा
अपरिचित आसमंताचा वेध घेणारा ‘किमया’ प्रयोग ‘किमया - अपरिचित आसमंताचा वेध’ हे माधव आचवल यांनी लिहिलेले पुस्तक. आचवल हे वास्तुविशारद, चित्रकार, लेखक व समीक्षक होते. या पुस्तकाच्या अभिवाचनाचा ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी सादर केलेला प्रयोग मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी अलीकडेच पाहिला. वास्तुकलासौंदर्य संवेदनशील असलेल्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language